फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण!
फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण!
पुणे, 3 जानेवारी 2025: येत्या पाच जानेवारीला आयोजित केली जात असलेली फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 ही नववर्षातील देशातील पहिली मॅरेथॉन आहे आणि मिलिंद सोमण हे फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. फिटनेस आयकॉन म्हणून परिचित असलेले त्याचबरोबर विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे मिलिंद सोमण हे हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. आपल्या प्रत्यक्ष सहभागातून मिलिंद सोमण समुदायाला एकत्र येण्याबरोबरच या ऐतिहासिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहेत.
मॉडेलिंग, अभिनय आणि फिटनेस या क्षेत्रात वैविध्यपूर्ण कारकीर्द असलेले मिलिंद सोमण हे एक कुशल व्यक्तीमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. फिटनेसबाबत अतिशय दक्ष असलेल्या मिलिंद सोमण यांनी अवघ्या 15 तास आणि 19 मिनिटांत अतिशय खडतर अशी आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. 10 किमी पोहणे, 421 किमी सायकलिंग आणि 84 किमी दुहेरी मॅरेथॉन या तीन क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या अल्ट्रामॅन ट्रायथलॉनमधील यशस्वी सहभागाबद्दल ते आता “अल्ट्रामॅन” म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे तर अनवाणी धावण्यासाठीसुध्दा ते ओळखले जातात. आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी मिलिंद सोमण यांनी 1984 च्या पहिल्यावहिल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत जलतरणामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आणि आणि या स्पर्धेत त्यांनी रौप्य पदकसुध्दा जिंकलेले आहे.
“तुमच्याकडे असणारा सर्वात शक्तिशाली स्नायू म्हणजे मन हा होय. तंदुरुस्ती म्हणजे जीवनाचा सर्वात सकारात्मक मार्गाने आनंद घेणे. तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल तुम्हाला मजबूत बनवते, पण त्याचबरोबर तुम्हाला निरोगीपणाच्या अगदी नजीक आणते. कठोर परिश्रम घ्या आणि आपल्या ध्येयावर सदैव लक्ष केंद्रित करा आणि फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये आपण सारे भेटू या”, अशा प्रेरणादायी शब्दांत मिलिंद सोमण यांनी समुदायाला एकत्र येण्याचे त्याचबरोबर मॅरेथॉनमध्ये अतिशय उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
फेडरल बँकेचे मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस. मूर्ती याप्रसंगी बोलताना म्हणाले, “फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीचा शुभारंभ हा आमच्यासाठी एक रोमांचक क्षण आहे. फेडरल बँकेसाठी पुणे ही एक अतिशय महत्त्वाची आणि विस्तारणारी बाजारपेठ आहे. नागपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूरमध्ये आमचा बँकीग व्यवसाय विस्तारत असताना मॅरेथॉन्समुळे स्थानिक समुदायाशी जोडण्याची आम्हाला संधी मिळत आहे. कॉस्मोपॉलिटन रुपामुळे पुण्याची इतर राज्यांच्या राजधान्यांशी असलेल्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे फेडरल बँक पुणे मॅरेथॉन केवळ तेथील धावपटूंनाच पुण्याकडे आकर्षित करत नाही, तर त्यांच्या धावगतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबालासुध्दा या शहराकडे आकर्षित करेल, अशी आम्हाला आशा आहे. आमच्या बँकेतील सहकाऱ्यांनी अभिमान बाळगावा अशा पध्दतीने ते ग्राहकांना सातत्याने प्रदान करत असलेली सेवा त्याचबरोबर समुदायाशी आमचे घट्टपणे जुळलेले बंध याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, अशी आमची नितांत इच्छा आहे. या उत्कृष्ट मॅरेथॉनसाठी तयार झालेला माहौल आणखी वातावरणनिर्मिती करेल, अशी मला खात्री आहे. २०२५ च्या शुभारंभप्रसंगी फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये धावपटूंच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत सोशल मीडियावरील विविध पोस्ट आणि त्यांच्यासंदर्भात झळकणाऱ्या माहितीची मी अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.”
‘द सह्याद्री रन’ असे नामकरण करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये पुण्याचे सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्टे उलगडणार आहेत. उत्साहाने सळसळणारे आणि फिटनेसला अनन्य साधारण महत्व देणाऱ्या पुणेकरांशी भावनिक बंध गुंफताना ही मॅरेथॉन समुदायाचा अभिमान फुलविण्याबरोबरच त्यांना स्वयं सुधारणांसाठी आणखी प्रेरित करत आहे. अनुभवी धावपटू असोत किंवा मैदानावर आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे हौशी धावपटू असोत, प्रत्येकासाठी या मॅरेथॉनमध्ये शर्यतीचे खास गट आहेत.
मॅरेथ़ॉन स्पर्धेचा तपशील:
पूर्ण मॅरेथॉन (42 किमी): उपस्थित राहण्याचा वेळ : पहाटे 4:30 वाजता, प्रत्यक्ष प्रारंभ पहाटे 5:00 वाजता भाप्रवेनुसार
अर्ध मॅरेथॉन (21 किमी): उपस्थित राहण्याचा वेळ: पहाटे 5:00 वाजता, प्रत्यक्ष प्रारंभ पहाटे 5:30 वाजता भाप्रवेनुसार
10 किमी: उपस्थित राहण्याचा वेळ: सकाळी 5;30 वाजता, प्रत्यक्ष प्रारंभ सकाळी 6;00 वाजता भाप्रवेनुसार
5 किमी फन रन: उपस्थित राहण्याचा वेळ: सकाळी 6:15 वाजता, प्रत्यक्ष प्रारंभ सकाळी 6:45 वाजता भाप्रवेनुसार

Comments
Post a Comment